कंबरदुखीसारखा मानेचा त्रासही तेवढाच कॉमन आजार आहे. आपल्यातील बहुतेकांना मानेचा त्रास असतो. मानेचं दुखणं बर्याच वेळा खांद्यात आणि पाठीच्या वरच्या भागात जाणवतं. कधी कधी हे एवढं असह्य होतं की भाजी निवडत बसलेली गृहिणी म्हणते, बस्स आता नाही जमणार. ऑफिसमध्ये कम्प्युटवर काम करणारी व्यक्तीही या दुखण्यामुळे अस्वस्थ होते. हे मानेचं दुखणं कधी कधी एवढं असह्य होत की हाती घेतलेलं काम न संपवता बाजूला टाकून द्यावं लागतं. मानेचा त्रास बऱ्याच कारणाने होऊ शकतो. तुमच्या झोपायची पद्धत, तुम्ही कुठल्याप्रकारच्या आणि किती उशा घेता, झोपताना, बसताना तुम्ही कसे बसता हे महत्त्वाचं आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानेच मानदुखी उद्भवते.
जर तुम्हाला फक्त मानेतच दुखत असेल (म्हणजे कण्याच्या मधोमध किंवा मानेच्या एका बाजूला) तर याचा अर्थ असा की तुमच्या मणक्यात किरकोळ बदल झाले आहेत आणि ही आजाराची सुरुवात आहे. म्हणून तुम्ही लवकर उपचार केले तर १०० टक्के बरे व्हाल.
जर तुम्हाला मानेच्या दुखण्यासोबत दोन्ही खांद्यात किंवा मानेपासून खांद्यापर्यंत आणि पाठींच्या वरच्या भागात किंवा खांद्यापासून संपूर्ण हातात वेदना होत असतील, वेदनेसोबत हाताला मुंग्या येत असतील, म्हणजे तुमचा आजार वाढलेला आहे. अशा रुग्णांनी अजिबात दुर्लक्ष करू नये.
मानेच्या त्रासामुळे काही लोकांना डोकेदुखी जाणवते डोकं मागच्या बाजूला दुखतं (ऑप्टिकल हेडॅक) किंवा मधोमध दुखतं नंतर मागच्या बाजूला पसरतं. आणि यामुळे डोळ्यावरही ताण जाणवतो (टोटल हेडॅक). मानदुखीमुळे चक्कर येणं, मानेची हालचाल केल्यावर मळमळणं याला ‘vertigo’ असे म्हणतात. साधी मानदुखी पुढे किती त्रासदायक ठरू शकते हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणून पेन क्लिअर टॅबलेट घेऊन तात्पुरतं दुखणं कमी करण्याऐवजी स्पेशालिस्ट फिजोधेरेपिस्टला दाखवा, योग्य निदान करा आणि आजार नाहीसा करा. यानंतर भविष्यात हा त्रास परत होऊ नये म्हणून फिजिओथेरपीस्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. एमडीटी सारख्या उपचारपद्धतीने रोगी लवकर बरे होतात
मानेतल्या मणक्यांमध्ये नक्की काय बदल होतो आणि कशामुळे मान दुखायला सुरुवात होते याची चर्चा पुढच्या लेखात.
コメント