चांगली पर्सनॅलिटी जपण्यासाठी फक्त सुंदर दिसून चालत नाही. त्यासाठी देहबोलीही आत्मविश्वासपूर्ण असायला हवी. पण दुखरी कंबर, ठणकणार्या टाचांमुळे बऱ्याचदा आपण आत्मविश्वासच गमावून बसतो.
स्वयंपाकघरातील काम हा प्रत्येक गृहिणीच्या दिनचर्येतील अगदी महत्त्वाचा घटक आहे. पण स्वयंपाकघरात असताना किती वेळा ' आई गं माझी कंबर', ' आऊच, माझी पाठ गेली कामातून' असे उद्गार तुमच्या तोंडून निघतात. बर्याच वेळा असेही मनात येते ना की, कधी माझे काम संपते आणि मी अंथरुणांला पाठ टेकते.
कधी विचार केला आहे का, की एखादे काम करताना किंवा काम संपल्यावर तुमची पाठ, कंबर किंवा मान का दुखायला लागते ? याचे उत्तर असे की, आपल्या पाठीच्या कण्याची जी घडण आहे तिला तसेच राखून जेव्हा तुम्ही उभे राहता किंवा बसता तेव्हा मणक्यांवर कुठल्याच प्रकारचा स्ट्रेस नसतो, आणि यालाच ‘Correct posture' असे म्हणतात. अचूक पोश्चवरमध्ये काम करत असताना दुखणे जाणवत नाही, कारण तेव्हा आपले मसल्स आणि लिगामेटसवर कुठल्याच प्रकारचा ताण नसतो.
बहुतेक लोकांना क॑बरेतून वाकून बसायची सवय असते. उभे राहतानाही बरेच लोक कंबरेतून ताठ उभे राहत नाहीत. या सवयीमुळे पुढे आपल्याला किती त्रास होऊ शकतो, याची कुणालाच कल्पना नसते. चुकीच्या पद्धतीत जेव्हा आपण उभे राहतो किंवा बसतो तेव्हा स्पाईनला आधार देणाऱ्या लिगामेंट्सवर खूप ताण पडतो आणि 'पाठ किंवा कंबर दुखायला लागते. स्पाईनवर असा स्ट्रेस जर जास्त वेळ राहिला तर याचा परिणाम दोन मणक्यांमध्ये असणाऱ्या डिस्कवर होतो. डिस्कच्या सभोवती असणारे फायबर्स जेव्हा जास्त ताणले जातात तेव्हा ते फाटतात आणि डिस्क बाहेर येते... बाहेर आलेल्या डिस्कलाच 'स्लिप डिस्क' असे म्हणतात. या डिस्कमुळे जेव्हा शीर दाबली जाते तेव्हा पाय दुखायला लागतो, पायाला मुंग्या येतात, पाय बधीर होतो.
अशा वेळी : खाली वाकायला जमत नाही. सकाळी उठल्यावर दुखण्यामुळे कंबर ताठ करायला जमत नाही, शिंकताना किंवा खोकताना वेदना अधिक तीव्र होतात, दुखण्यामुळे १०-१५ मिनिटांहून जास्त वेळ बसायलाही जमत नाही आणि उभे राहायलाही जमत नाही.
कंबरदुखीसारखा मानेचा त्रासही तेवढाच कॉमन आजार आहे. पोळ्या लाटताना किंवा भाजी चिरताना तुम्हाला कधीतरी मानेचे दुखणे जाणवले असेल. बर्याच वेळां मानेचे दुखणे कधीकधी एवढे असह्य होते की हाती घेतलेले काम न संपवता बाजूला टाकून द्यावे लागते. मानेचा त्रास बर्याच कारणाने होऊ शकतो. तुमची झोपायची पद्धत, बसायची सवय, झोपताना तुम्ही कुठल्या प्रकारच्या आणि किती उश्या घेता या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानेच त्रास वाढतो. तुम्हाला सकाळी उठल्यावरच मानेत दुखते आणि दिवसभरात दुखत नसेल तर याचा अर्थ असा होतो की, दोष तुमच्या उशीत, मॅट्रेसमध्ये,किंवा तुमच्या झोपायच्या पद्धतीत असावा. पोटावर झोपण्याची सवय असेल तर ही सवय सोडून द्या, कारण या अवस्थेमध्ये डोके पूर्ण एका बाजूला असते म्हणून मानेच्या वरच्या भागातील लिगामेंट्स व मसल्सवर खूप ताण पडतो आणि म्हणून सकाळी उठताना मानेत स्टिफनेस आणि वेदना जाणवतात, म्हणून हे लक्षात ठेवा -
• बेडवरून उठताना नेहमी एका कुशीवर वळून उठा, मान झटक्याने वळवायची नाही.
• शिंकताना किंवा खोकताना मान झटक्याने एकदम खाली वाकवू नका.
• उशीशिवाय झोपू नका. झोपताना तुम्हाला तुमची उशी कम्फर्टेबल वाटत नसेल तर 'Soft cervical pillow ‘ चा वापर करा.
कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे थोडक्यात स्पाईन प्रॉब्लेमसारखे टाचेचे दुखणेही बर्याच लोकांना हैराण करून सोडते. टाचेच्या दुखण्याला “प्लान्टर फेशिआईटीस 'असे म्हणतात. याचे लक्षण म्हणजे टाचेत आणि तळव्याच्या मधल्या भागात वेदना जाणवतात. दुखण्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय टेकवताना त्रास होतो. हा त्रास का होतो ? ज्यांना सतत उभे राहून काम करावे लागते, अशा लोकांमध्ये टाचेचे नॅचरल कुशन आकसले जाते आणि भार सहन करण्याची क्षमता कमी होते. जास्त वजन असणाऱ्या लोकांनाही हा आजार होण्याचा धोका असतो. उंच टाचेच्या चपला दीर्घकाळ वापरल्यामुळेही टाच दुखते. जर अधूनमधून पायाचे दुखणे जाणवत असेल तर तुमचे पाय विशेषतः पंजे तपासून घ्या.
टाचेचे दुखणे, कंबरदुखी, गुडघेदुखी हे सगळे ऑर्थोपीडिक प्रॉब्लेम्स एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणूनच कुठलाही एक सांधा दुखायला लागला तर दुसराही काही दिवसांनी दुखायला लागतो. असले आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे असे कुणी विचारले तर माझा सल्ला असा की,
• आधी तुमचे पोश्चवर व्यवस्थित करा.
• उभे राहताना दोन्ही पायांवर समान भार देऊन कंबरेतून ताठ उभे राहा.
• बसताना कंबरेतून ताठ बसा. एखाद्या कामासाठी जास्त वेळ बसणे भाग पडत असेल तर टेकून बसा. बॅक सपोर्टचा वापर करा. उदा. लंबार कुशन, लंबार पिलो.
• एकाच ठिकाणी जास्त वेळ उभे राहणे टाळा आणि टाळता येत असेल तर ऑर्थोपीडिक फुटवेअरचा वापर करा. ऑर्था इन्सोल्स पायावर, गुडघ्यावर, कंबरेवर येणाऱ्या स्ट्रेसला बर्यापैकी कमी करून तुमचे उभे राहणे कम्फर्टेबल करते.
• नियमित ‘Back stretching’ करा.
काळजी घेऊनसुद्धा दुखणे कमी होत नसेल तर स्पेशलाइज्ड फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करा. तुमची कंबरदुखी किंवा पाठदुखी इतर कुठलीही सांधेदुखी कशामुळे आहे, याचा नुसता विचार करत बसू नका. आज नाही तर उद्या बरे वाटेल, वेदना आपोआप कमी होतील, अशी चुकीची समजूत जाळी न बर्याचदा किरकोळ आजाराचे गंभीर आजारात रूपांतर होते आणि तेव्हा एकच विचार मनात येतो को जर मी याची आधीच दखल घेतली असती तर मला आज एवढा त्रास सहन करावाच लागला नसता.
सांगायचे तात्पर्य एवढेच की, बऱ्याच आजारांच्या लक्षणांमध्ये साम्य असते. कधीकधी एका विशिष्ट कारणामुळे जाणवणारा त्रास भलत्याच कारणामुळेही होऊ शकतो. स्पेशलाइज्ड ऑर्थोपीडिक फिजिओथेरपिस्ट आधुनिक उपचार पद्धतीने अशा आजारांवर उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर बरे करतात. बरे झाल्यावरही म्हणजे वेदनामुक्त झाल्यावरही एकदा फिजिओथेरपिस्टकडून चेक-अप करून घ्या. सगळे व्यवस्थित असल्यास फिजिओथेरपिस्ट तुम्हाला एक फिटनेस रेजिम देतील जेणेकरून भविष्यातही तुम्हाला त्रास होणार नाही. स्लीप डिस्क, स्पॉण्डिलायटिस यासारख्या आजारांना घाबरू नका. तुम्ही नक्की बरे होऊ शकता. फक्त लवकरात लवकर योग्य ते उपचार सुरू करा आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करा.
Comments